पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निघृर्ण हत्या हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण! – अजित पवार

मुंबई

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निघृर्ण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

शाळेत शिकणार्‍या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणार्‍या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून घटनेत प्राण गमावणार्या मुलीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तिच्या मारेकर्‍यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव- शोक व्यक्त केला आहे.

अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत-

अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणार्‍या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे असे अजित पवार म्हणाले.

मृत मुलगी करत होती कबड्डीचा सराव –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली मुलगी ही इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती शाळेत कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

मानेवर केले कोयत्याने वार –

यावेळी त्या मुलांनी तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिची निघृर्ण हत्या केली आहे. धडापासून डोके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय –

खून केलेला कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून आरोपी पसार झाले. दरम्यान, आरोपीकडे पिस्तुल देखील होते. ते त्याने गुन्हा करते वेळी काढता आले नाही. ते पिस्तुल त्याने तेथेच टाकून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!