बल्लारपूर नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांचा समावेशन प्रक्रियेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई, दि. 13 :
बल्लारपूर नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांच्या समावेशन प्रक्रियेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबतचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांनी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांच्या समावेशन प्रक्रियेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली. या बैठकीला नगर विकास उप – सचिव सतीश मोघे, नगर परिषद प्रशासन उपायुक्त अनिकेत मानोरकर, अब्दुल करीम, शब्बीर अली उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांना बल्लारपूर नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांच्या समावेशन प्रक्रियेस विलंब होत असल्याची माहिती मिळाली. ही माहीती मिळताच यासंदर्भात तातडीने मुंबईत बैठक घेऊन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी प्रलंबित असलेला स्वच्छता निरीक्षकांचा समावेशन प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावला. येत्या काही दिवसात स्वछता निरीक्षक समावेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
संचालक, नगरपालिका प्रशासन, वरळी मुंबई यांनी दि. 4 जून २०१९ रोजी स्वच्छता निरीक्षकांची समावेशन प्रक्रिया पूर्ण करून पात्र अपात्र यादी जाहीर केली होती. त्या यादीत ज्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक अपात्र करण्यात आले आहे ते कारण चुकीचे व नियमबाह्य असल्याचे निदर्शनास येताच श्री. वडेट्टीवार यांनी आयुक्त यांना कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय तत्काळ दूर करून समावेशन करार करण्याच्या सूचना दिल्या.