पालघर जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करा – कृषीमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांचे यंत्रणांना निर्देश

हयगय करणाऱ्या उद्योग-आस्थापनांवर कारवाई करा; कारखान्यातून होणारे प्रदुषण रोखण्याचेही दिले निर्देश

मुंबई, दि. १२ – 

पालघर जिल्ह्यात औद्योगिक कारखाने-आस्थापना मोठ्या संख्येने आहेत.  याठिकाणी सुरक्षाविषयक सर्व मानकांचे पालन केले जाईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. शासनाच्या विविध विभागांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. सुरक्षाविषयक नियमांचे तसेच प्रदुषण विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग आस्थापनांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,  बोईसर, तारापूर, वसई औद्योगिक क्षेत्रास येणाऱ्या अडचणी, उद्योगातून होणारे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उपाययोजना, तक्रारी, नागरी सुविधा आदींबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री श्री. भुसे यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. खासदार राजेंद्र गावित, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचे माधव तोटेवाड, कामगार उपायुक्त के.व्ही. दहिफळकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी विजय पाटील यांच्यासह इतर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या काळात काही दुर्घटना घडल्या. त्यात जीवितहानी झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना वेळेत मदत मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी यंत्रणांनी सातत्याने पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. तसेच, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवरही कडक कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. सध्या या तपासणीचा वेग वाढविणे आवश्यक आहे. एमआयडीसी, प्रदुषण महामंडळ, अग्निशमन, औद्योगिक सुरक्षा अशा विविध शासन यंत्रणांनी समन्वयाने एकत्रितपणे कारखान्यांच्या तपासणी केली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. शासन यंत्रणांच्या परवानगीविना औद्योगिक क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या उद्योग-आस्थापनांवर कारवाईचे निर्देशही पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील औद्योगिक पट्टा हा संवेदनशील आहे. त्यामुळे येथे सर्व सुरक्षाविषयक नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. काही कारखान्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यामुळे स्थानिक शेतकरी, मच्छिमार यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. स्थानिक उद्योजक, कारखानदार यांनी त्याची त्वरित दखल घेऊन हे प्रदुषण रोखण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यातील कामगारांचे लसीकरण होईल, यासंदर्भात उद्योगांना सूचना द्याव्यात, कामाच्या ठिकाणी लस उपलब्ध करुन द्यावी, असे त्यांनी संबंधित यंत्रणेला सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!