कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 12 :

कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमिनीबाबत तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व प्रकल्पग्रस्तांची पात्रता, देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!