बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल – राज्यपाल
राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान
मुंबई, दि. 09 :
बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या ‘अपूर्ण आत्मकथा’ या मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील लोकांना विशेषतः युवकांना बांगलादेशचा प्रदीर्घ मुक्तीसंग्राम, त्यातील भारताचे योगदान तसेच शेख मुजिबूर रहमान यांच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक माहिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शेख मुजिबूर रहमान यांची जन्मशताब्दी तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शेख मुजिबूर रहमान यांच्या ‘अनफिनिश्ड मेमॉयर्स’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या ‘अपूर्ण आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
बांगलादेशच्या मुंबईतील उपउच्चायुक्तालयाच्या पुढाकाराने प्रसिद्ध झालेले ‘अपूर्ण आत्मकथा’ अपर्णा वेलणकर यांनी मराठीत भाषांतरीत केले असून इंडिया प्रिंटिंग वर्क्सने ते प्रकाशित केले आहे.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांगलादेश मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष व परोक्ष भाग घेतलेल्या निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत, लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंह ब्रार, लेफ्टनंट कमांडर अशोक बत्रा यांसह 20 युद्धवीरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बांगलादेशचे मुंबईतील उप उच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, बांगलादेशचे नवी दिल्लीतील उप उच्चायुक्त नुरुल इस्लाम, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व ऑल इंडिया असोसिएशन फॉर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के एम अब्दुल मोमीन यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.
शेख मुजिबुर रहमान सच्चे धर्मनिरपेक्ष नेते होते. आपल्या पक्षाचे नाव त्यांनी ‘मुस्लिम अवामी लीग’ असे न ठेवता ‘अवामी लीग’ असे ठेवले असे राज्यपालांनी नमूद केले. अपर्णा वेलणकर यांनी शेख मुजीब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करून भारत व बांगलादेशातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले. शेख मुजीब यांच्या ‘प्रिझन डायरीज’ या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या हस्ते अपर्णा वेलणकर तसेच इंडिया प्रिंटिंगचे आनंद लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बांगलादेश व भारताच्या राष्ट्रगीताने झाली.