कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणार्‍यांच्या नावाचा उद्या भांडाफोड करणार : नारायण राणे पुन्हा आक्रमक

मुंबई,

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑॅक्टोबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल. या उद्घाटनापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात बॅनरबाजी सुरू झाली असतानाच आता नारायण राणे यांनी शिवसेनेवरनिशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला वेगळाच आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑॅफ घ्यावा ते उद्या पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं? आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत? कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी.

कोकणात अडवणूक नाही तर हप्तेबाजी सुरू आहे. उद्या जाहीर सभेत कोण आहे त्यांची नावे सांगणार… ’हे’ ’हेच’ आहेत विरोध करणारे असं सांगणार. वास्तववादी चित्र कोकणी माणसासमोर ठेवणार, तुमच्या विकासाच्या आड येणारी ही लोकं आहेत. उद्या यांचा भांडाफोड करणार असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटनपूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे.

कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं विशाल परब यांनी म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे.

चीपी विमानतळाचे वेळापत्रक

मुंबई ते सिधुदूर्ग आणि सिधुदूर्ग ते मुंबई असा हवाई प्रवास येत्या 9 आँक्टोंबरपासून सुरू होतोय. त्यासाठी दररोज होणार्या नव्या चीपी विमानतळावर विमानांचे उड्डाण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.

1) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भूजहून येणारे ’9आय661’ क्रमांकचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक ऑॅफ घेईल. हे विमान विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल.

2) विमानाचा ’9आय661’ सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

3) सिंधुदुर्गातून शहरात जाण्यासाठी ’अलायन्स एअर’ चे 70 आसनी एटीआर 72-600 विमान तैनात राहणार आहे.

4) उद्घाटनाच्या दिवशी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 आहे तर सिंधुदुर्ग मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!