पाकिस्तानची पुन्हा फजिती! न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आणखी एका देशाचा क्रिकेट दौरा रद्द

मुंबई,

पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक धक्का बसला आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन देशांच्या टीमनं पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडच्या टीमनं पाकिस्तानात आल्यानंतर मॅच सुरु होण्याच्या काही तास आधी मॅच न खेळता परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडनंही पाकिस्तानचा दौरा रद्द केला. या दोन धक्क्यातून सावरण्यापूर्वी पाकिस्तानची आणखी एकदा फजिती झाली आहे.

यंदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डामुळेच त्यांची फजिती झाली आहे. श्रीलंकेची महिला टीम पाकिस्तानचा दौरा करणार होती. पण हा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. श्रीलंका महिला टीमचा हेड कोच हसन तिलकरत्ने याने ही घोषणा केली आहे.

श्रीलंका टीम 15 ऑॅक्टोबर रोजी पाकिस्तानात रवाना होणार होती, पण आता हा दौरा होणार नसल्याचं तिलरत्नेनं सांगितलं. पीसीबीनं काही लॉजिस्टिकच्या मुद्यामुळे हा दौरा रद्द केला आहे. श्रीलंकेच्या महिला टीमनं ऑॅक्टोबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही.

पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमधील तीन मॅचची वन-डे सीरिज 29 ऑॅक्टोबर रोजी सुरू होणार होती. दोन्ही देशांच्या महिला टीम 1998 पासून एकमेकांशी क्रिकेट खेळत आहेत. पण श्रीलंकेची टीम पहिल्यांदा पाकिस्तानात द्विपक्षीय सीरिज खेळण्यासाठी जाणार होती. यापूर्वी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सीरिज 2018 साली श्रीलंकेत झाली होती. तर श्रीलंकेच्या टीमनं 2006 साली आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानाचा दौरा केला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या या प्रयत्नांना फारसं यश मिळालेलं नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!