दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता
मुंबई,
राज्यात 4 ऑॅक्टोबरपासून शाळा सुरू झाल्या आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आजपासून भाविकांसाठी मंदिरांचे दार खुले करण्यात आले. मात्र कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसर्या लाटेची शक्यता आहे, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यात ‘मिशन कवच कुंडल’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 8 ऑॅक्टोबर ते 14 ऑॅक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. राज्यात 1 कोटी कोरोना लसीचा साठा उपलब्ध असून दररोज 15 लाख नागरिक लसवंत होणार आहेत. तसेच राज्यात कुठेही लसीची कमतरता भासणार नसल्याची दक्षता या मोहिमेत घेण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
दसरा दिवाळीनंतर राज्यात तिसर्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असल्यामुळे आम्ही विशेष लसीकरण मोहिम राबवत असल्याचे राजेश टोपे म्हणाले. परंतु मालेगावसारख्या ठिकाणी अजूनही योग्य प्रमाणात लसीकरण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लसीकरण करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.