पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई,
पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
वातावरणीय कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमृत नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी सहभागी झाले होते.
या वेबिनारमध्ये माझी वसुंधरा १ चे विश्लेषण तसेच माझी वसुंधरा २ ची तयारी, पाणथळ क्षेत्रे, वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियमात करण्यात आलेली सुधारणा, रेस टू झिरो आणि कार्बन न्यूट्रॅलिटी त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहन धोरण व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची एककेंद्राभिमुखता या विषयांचा आढावा घेण्यात आला.
वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. वातावरणीय बदल रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहेत. यासाठी सर्व यंत्रणांनी शाश्वत विकास म्हणजे काय हे समजून त्यावर लक्ष केंद्रित करावे. विकास होत असताना ऊर्जेची आवश्यकता असते, ती ऊर्जा पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत माझी वसुंधरा अभियानात उत्तम काम झाले, त्याचपद्धतीने पुढील कामगिरी करताना समाजातील विविध घटकांना सामावून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात असलेल्या पाणथळ क्षेत्राबाबतही लक्ष देण्याची आवश्यकता श्री ठाकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोविड काळातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार आले. आघाडीचे राज्य म्हणून राज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे, त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय हे समजून घेणे आणि त्यानुसार पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. वातावरणीय बदलाचे परिणाम रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा जेथे जेथे उल्लेख होईल, तेथे महाराष्ट्राचा उल्लेख झालाच पाहिजे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक वाहनांबाबत आवाहन करताना चार्जिंग स्टेशन्स वाढवावीत तसेच सर्व शासकीय आणि महापालिका स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा, ज्यामुळे नागरिकांमध्येही विश्वास निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील काही वर्षांमध्ये सर्वाधिक संख्येने इलेक्ट्रिक वाहने वापरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण राज्यमंत्री श्री.संजय बनसोडे यांनी माझी वसुंधरा टप्पा एक च्या यशानंतर नवीन महत्वपूर्ण अध्याय सुरू होत असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आपण देश आणि एकूणच जगासमोर आदर्श निर्माण करू, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. हवामान अनुकूल महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काम करू, असे त्यांनी सांगितले.
प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी सर्व विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. पर्यावरण संवर्धनासाठी करावयाच्या वातावरण कृती कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन विभाग आणि जिल्ह्यांकडून असलेल्या अपेक्षा त्याचबरोबर पुढील काळात त्यांचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यात सध्या ३८६ इलेक्ट्रिक बस असल्याचे सांगितले. यापुढे सर्व बस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन करण्यात आले असून २१०० बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. २०२३ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन आपल्याकडे दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री.जऱ्हाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेतले जात असल्याचे सांगितले. आता केवळ प्रदूषण झाल्यावर कारवाई करण्याचे नव्हे तर प्रदूषण होऊ नये यासाठी काम केले जात असल्याचे ते म्हणाले.
वाहनांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १५ व्या वित्त आयोगामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याअनुषंगाने मोठ्या शहरांतील महानगरपालिका आयुक्तांशी संवाद साधून सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढून प्रदूषण कमी करण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.