’कोरोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा जाहीर होणारच…’, संजय राऊतांचे मोठे विधान
मुंबई,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गतवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यामंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑॅनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यंदाच्या वर्षी ऑॅनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. आणि याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा हा यंदा कोरोनाचे नियम पाळून होणार आहे. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑॅनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मात्र, यावेळी हा मेळावा जाहीर होणार आहे. अशी माहितीदेखील राऊत यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गतवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न घेता आवश्यत ती खबरदारी घेऊन हा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून केवळ 50 जणांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा हा ऑॅनलाईन पद्धतीने घेण्यात आला. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे अंतिम निर्णय काय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.