मुंबईतील ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई,
मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा 6 किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.
गड- किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करीत असताना तो एकत्रितपणे तयार करण्यात यावा. याबरोबरच राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण 60 किल्ल्यांचा विकास आाराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसात सादर करण्यात यावेत. लातूर जिल्ह्यातील औसा आणि उद्गीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच राज्यातील 18 संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची काय कामे करण्यात येत आहेत याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्यात असेही निर्देश आज दिले.
महाराष्ट्रातील एकूण 60 किल्ले राज्य संरक्षित किल्ले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी वित्त विषयक तज्ज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी. या तज्ज्ञ सल्लागारांनी दिलेला अहवाल शासनास त्यानंतर सादर करण्यात यावा अशा सूचनाही यावेळी श्री. देशमुख यांनी दिल्या.