पेट्रोलनंतर डिझेलचंही शतक, या राज्यात किंमतींने ओलांडला 100 चा टप्पा
मुंबई,
भारतात पेट्रोलच्या किंमतीं नवनवे विक्रम प्रस्थापित करत असताना डिझेलनंदेखील आपलं शतक पूर्ण केलं आहे. देशातील एका राज्यामध्ये डिझेलच्या किंमतींनी 100 चा टप्पा पार केला असून इतर राज्यांमध्ये ते शंभरीच्या जवळ आहे. सर्वसामान्यांचं बजेट यामुळे पुरतं कोलमडून पडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या असून आता या दोन्ही इंधनांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचं चित्र आहे.
राजस्थानमध्ये सध्या देशातील सर्वात महाग डिझेल मिळत असून एक लिटर डिझेलसाठी 100.10 रुपये मोजावे लागत आहेत. जयपूरमध्ये सोमवारी डिझेलच्या दरात नवा विक्रम नोंदवण्यात आला असून ते शंभरीच्य वर पोहोचलं आहे. राजस्थान पेट्रोलिअम असोशिएशननं दिलेल्या माहितीनुसार जयपूरमधील डिझेलचे दर शंभरच्या पार पोहोचले आहेत. तर राजस्थानच्या सीमावर्ती भागातील दर हे जयपूरच्या तुलनेत अधिक आहेत. याचाच अर्थ राजस्थानच्या इतर भागातदेखील डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे.
देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरच्या पार पोहोचल्या असून डिझेलच्या किंमती नव्वदीत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.39 रुपये तर डिझेलचा दर 90.77 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 108.43 रुपये तर डिझेलच्या एका लिटरसाठी 98.48 रुपये मोजावे लागत आहेत.
चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर
मुंबई – पेट्रोल 108.43, डिझेल 98.48
दिल्ली – पेट्रोल 102.39, डिझेल 90.77
चेन्नई – पेट्रोल 100.01, डिझेल 95.31
कोलकाता – पेट्रोल 103.07, डिझेल 93.87
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.