आयपीएल 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी, टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला टी 20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळणार?

मुंबई,

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेची सुरुवात यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑॅक्टोबरपासून होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी भिडणार आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी मुंबईचा युवा आणि आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादवलाही संधी देण्यात आली. निवड समितीने श्रेयस अय्यर आणि शिखर धवनसारख्या खेळाडूंना डच्चू देत सूर्यावर विश्वास दाखवला. मात्र सूर्या निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवण्यात अपयशी होताना दिसतोय. सूर्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पंजाब विरुद्धच्या सामन्यात शून्यावर आऊट झाला. त्यामुळे सूर्याला टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर करा, अशी मागणी केली जात आहे.

निराशाजनक कामगिरी

सूर्यकुमार यादवला आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसर्‍या टप्प्यातील 4 सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. सूर्याने गेल्या 4 सामन्यात अनुक्रमे 3,5,8 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. सूर्या सातत्याने अपयशी ठरतोय. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच त्याला ट्रोलही केलं जात आहे. सूर्याची निराशाजनक कामगिरी ही मुंबईसाठी पर्यायाने आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने चिंताजनक विषय आहे. सूर्या सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याला टी 20 वर्ल्ड कपमधून वगळण्यात यावं, अशी मागणी नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.

तर डच्चू मिळणार?

टी 20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीने सिनियर खेळाडूंना वगळून नव्या दमाच्या शिलेदारांना संधी दिली. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या युवा खेळाडूंना आयपीएलच्या 13 व्या मोसमात आणि श्रीलंका दौर्‍यात दमदार कामगिरी केली. सूर्याने तर बॅटने धमाकाच केला. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपसाठी संधी देण्यात आली. मात्र आता आयपीएलमध्ये सूर्याला सुर गवसताना दिसत नाहीये. त्यामुळे सूर्यावर संघातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार, टीम मॅनेजमेंट वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात 10 ऑॅक्टोबरपर्यंत बदल करु शकते, असं म्हटलं जातंय. त्यामुळे सूर्यकुमारला टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात कायम ठेवणार की डच्चू मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!