कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही मात्र बलात्कार्‍यांना वाचवण्यासाठी एकी; चित्रा वाघ यांचा आरोप

मुंबई

डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बलात्कार्‍यांना राजाश्रय देण्याचं काम सुरु असून कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्कार्‍यांना वाचवण्यासाठी ते सर्व एकत्र येतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. डोंबिवली घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून यामध्ये 33 आरोपींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘डोंबिवलीची घटना ही कालचीच आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे महिला आणि मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरु आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही. अशी घटना घडल्यानंतर सरकार त्या गुन्ह्याबद्दल काय भूमिका घेत हे महत्त्वाचं असत. पण बलात्कार्‍यांना वाचवण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष एकत्र येतात.‘

संजय राठोड आणि मेहबूब शेखवर कारवाई नाही

चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘शिवसेनेचा नेता संजय राठोडवर अद्याप मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही. तर मेहबूब शेखवरही काहीही कारवाई होत नाही, त्याला अद्याप अटक केली नाही. गृहमंत्री राष्ट्रवादीचे, मेहबूब शेखही राष्ट्रवादीचा. सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून त्याला रॉयल ट्रीटमेंट देतात का?‘

कोर्टाचे आभार मानते

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपण कोर्टाचे आभार मानत असल्याचं सांगत म्हणाल्या, ‘औरंगाबाद पोलिसांनी कोर्टात सादर केलेला बी समरी रिपोर्ट कोर्टाने फेटाळला आहे. पोलीस पीडितेसाठी काम करत नव्हते तर आरोपी मेहबूब शेखसाठी काम करत होते. पोलिसांनी पीडितेच्या घरी भेट देऊन तिची बदनामी करण्याचं काम केलं. आरोपी हा राजकीय माणूस असल्याने अस जाणूनबुजून असं करण्यात आलं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी आमची मागणी आहे.

पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे मेहबूब शेख याला अटक करावी आणि दीपक गिरी आणि निशिकांत भुजबळ या अधिकार्‍यांच निलंबन करावं अशीही आपली मागणी असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. मुंबईच्या महापौर बोरिवलीला गेल्या. त्याच स्वागत करतो. पण तशाच त्या डोंबिवलीला का नाही गेल्या, त्या प्रकरणाची दखल घ्यावी वाटली नाही का असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!