चंद्रपूर येथील वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, :

 चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार आणि विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) जी.साईप्रकाश,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी   अजय गुल्हाने व वन विभागाचे अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

स्वतंत्र संचालक पद

वन अकादमीला स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्यासाठी  संचालक पदावर  स्वतंत्र व्यक्तीची  तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. तसेच संस्थेत वन अधिकारी प्रशिक्षणासोबतच वन, वन्यजीव, पर्यावरण व वातावरण बदल या आधारित पदविका ते पदव्युत्तर अभ्यासक्रम आयोजित करावेत असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

वन विद्यापीठ

वन अकादमीचे वन विद्यापीठात रूपांतर करण्याच्या श्री. मुनगंटीवार यांच्या मागणीवर यासंदर्भात समिती स्थापन करावी, समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वन अकादमीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीसही मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली.

कोविड संकटाच्या काळात चंद्रपूर वन अकादमीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आता अकादमीचे व प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सुरू करावयाचे असल्याने कोविड केअर सेंटरचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची पाहणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वन अकादमीचे रूपांतर वन विद्यापीठात करण्यासाठी समिती नेमावी,अकादमीतील रिक्त पदांची भरती करावी, अकादमीतील उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अकादमीत वन, पर्यावरण व आयुर्वेदावर आधारित अभासक्रम सुरू करावेत अशा मागण्या यावेळी श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!