दिवाळीनंतर राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक

मुंबई

कोरोनाचे संकट राज्यावर ओढावल्यापासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे कधी सुरु होणार, याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मुंबईत बोलताना आज अजित पवार म्हणाले की, राज्यात 2 ऑॅक्टोबर पर्यंत कोरोनाची परिस्थिती बघायची. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतील, असे अजित पवार म्हणाले.

दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. पेडीएट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकारला गणेशोत्सवानंतर 20 दिवस कोरोनाची स्थिती पाहून तिसर्‍या लाटेची साधारण शक्यता पाहून यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत आधी सुद्धा पेडीएट्रिक टास्क फोर्स सकारात्मक होते, पण शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा लसीकरण पूर्ण झाल्यास व ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्यासाठीची तयारी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात याव्यात असे मत मांडले होते.

आता लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागवली असून शाळा सुरू करब्याबाबत पूर्वतयारी सुद्धा केली जात आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाने सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन सुरू ठेवले आहे. मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा आयुक्त घेतील आणि जर दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला, तर तो सर्व बोर्डाच्या शाळांसाठी लागू असेल, अशी देखील माहिती आहे. पण शाळा कधी सुरू कराव्यात ? याबाबत एकवाक्यता नसल्यामुळे यावर टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा विचार करून राज्य सरकार कोरोना स्थिती नियंत्रणात राहिली, तर नक्कीच दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर जरी शाळा सुरू करण्याची शक्यता असली, तरी विविध जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!