बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक – कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर
जागतिक बाल कामगार दिनानिमित्ताने ऑनलाईन वेबिनाराचे आयोजन
मुंबई, दि. 11 : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त ‘बाल कामगार’ या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता कामगार विभागामार्फत प्रयत्न करीत आहेत. याशिवाय राज्यभरात बाल कामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मात्र बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
जागतिक बाल कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार आयुक्तालयामार्फत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आज घेण्यात आले. आज घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये औद्योगिक संघटना आणि असोशिएशन, व्यापारी असोशिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसाययातील मालक असोशिएशन, सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, नागरिक यांनाही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम, 2016 बाबत माहिती देण्यात आली.