आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे – माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे
मुंबई, दि. 11 : आपत्ती काळात जनतेपर्यंत काही वेळा चुकीची माहिती पोहोचली तर हाहाकार होवू शकतो. यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
दि. 10 जून रोजी मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध महानगर पालिकांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी डॉ.दिलीप पांढरपट्टे बोलत होते.
डॉ. पांढरपट्टे म्हणाले, कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी त्या विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रत्येक विभागाने तयार केला असल्याने जनतेला आणि प्रसारमाध्यमांना आवश्यक ती माहिती तत्काळ मिळणे आवश्यक आहे. यासाठी वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन आणि समाजमाध्यमांचा उपयोग करावा.
यावेळी विविध महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी व सिडकोचे अधिकारी तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.