राज्यपालांनी विरोधीपक्षाचे थोबाड फोडले पाहिजे, पण.., संजय राऊतांचा घणाघात
मुंबई,
राज्यपालांनी विशेष अधिवेशनाची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना चांगलाच टोला लगावला आहे. ’जर विरोधीपक्ष राज्याची बदनामी करत असेल. जे चिखलफेक करीत असेल तर त्यांनी विरोधी पक्षाचं थोबाड फोडला पाहिजे, त्यांचे कान उपटले पाहिजे राज्यपाल मात्र त्यांना राजभवनात बसून उत्तेजना देत आहे’ असा घणाघाती टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्र व्यवहारावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
’महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी अशा प्रकारची गंमत नेहमी करत असतात. भाजप शासित राज्यात यापेक्षा जास्त मोठ्या घटना घडत असतात. गुजरातमध्ये रोज 3 बलात्काराच्या घटना घडता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आणि परखड आहे. हा राज्याचा विषय नाही हा राष्ट्रीय विषय आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अनेक घटना घडत असतात. गुजरातच्या राज्यपालांनी अधिवेशन घेण्याचे ठरविले तर दोन दिवसाचा नाही तर एका महिन्याचा घ्यावं लागेल’ असा टोला राऊत यांनी लगावला.
’महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबत उभा दावा मांडला आहे. हे आता स्पष्ट दिसत आहे. पत्र मीडियाकडे लिंक करण्याची गरज नव्हती. राज्यपाल हे राज्याचे पालक आहे पण राज्याची बदनामी करून काय साधायचे आहे. जर विरोधीपक्ष राज्याची बदनामी करत असेल. जे चिखलफेक करीत असेल तर त्यांनी विरोधी पक्षाचं थोबाड फोडला पाहिजे, त्यांचे कान उपटले पाहिजे. राज्यपाल मात्र त्यांना राजभवनात बसून उत्तेजना देत आहे’ अशी टीकाही राऊत यांनी राज्यपालांवर केली.
’राज्यपालांच्या विरोधामध्ये एक दिवस दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगावे लागेल की राजभवनात काय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दस्तावेज आहे हा दस्तावेज आता राजभवनाच्या पटलावर आहे. राज्यपाल यांनी झाकली मूठ उघडण्याची गरज नव्हती आता त्यांनी मूठ उघडली आहे. राज्यपालांचे आ बैल मुझे मार असं काम केलं आहे. आता फक्त मूठ उघडली आहे, अजून काही उघडायला लावू नका’ अशा इशाराही राऊत यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना मा. राज्यपाल महोदयांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहात आहे. आपण सगळेच प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. श्रीरामांनी महिलांचे रक्षण, सुरक्षा यासाठी धनुष्यबाण नेहमीच सज्ज ठेवला. पण त्या ’रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? उत्तर प्रदेशात एका महिला खो खो खेळाडूवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. बिजनोरमध्ये रेल्वे स्थानकावर या पीडित मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. 10 सप्टेंबरला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नोकरीसाठी मुलाखत देऊन येताना रेल्वे स्थानकावरच ही घटना घडली. आरोपीने या मुलीवर बलात्कार केला व तिला ठार केले. उत्तर प्रदेशातील हाथरस, उनावमधील बलात्कार व अत्याचारांच्या घटनांनी अनेकदा देशाला धक्का बसला आहे. बदायू जिल्ह्यातील दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्येच्या घटनेचे पडसाद तर संयुक्त राष्ट्रात उमटले होते. उत्तर प्रदेशात महिलांवरील अशा प्रकारच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचे र्ण्ींँ चे म्हणणे आहे. पण यावर तेथे विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून चर्चा करावी अशी मागणी तेथील भाजपने केल्याचे दिसत नाही.
जम्मू-कश्मीरमधील कश्मिरी पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे नेहमीच शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांच्या नराधमी कृत्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मीरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी गांभीर्याने चर्चा केली.
उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वत: या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेखदेखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत.