दुसर्‍या पत्नीशी वाद, पहिल्या पत्नीच्या 4 वर्षांच्या मुलाची सर्वांसमोर आपटून केली हत्या

नवी मुंबई,

दुसर्‍या पत्नीसोबत झालेल्या वादातून एका पित्याने त्याच्या पोटच्या चार वर्षीय मुलाची डोके आपटून हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील सानपाड्यात घडली आहे. सानपाडा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर या क्रूर पित्याने स्वत:च्याच चार वर्षीय मुलाचे एक दोन नव्हे तर तीन वेळा डोके आपटले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोटच्या मुलाचा खून करणार्‍या त्या नराधम पित्याला वाशी जीआरपी पोलिसांनी गजाआड केले आहे.

सकलसिंग पवार असे त्या नराधम पित्याचे नाव आहे. तो मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील आहे. नवी मुंबईतील सानपाडा पुलाखाली तो त्याच्या परिवारासह राहत होता. भीक मागून गुजराण करत होता. सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होत असत. घटनेच्या दिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी फलाटावर सर्वजण एकत्र चालत असताना सकलसिंग पवार याचा त्याच्या दुसर्‍या पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्व:ताचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. स्टेशनवर असणार्‍या लोकांनी त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिला. त्यातच त्या मुलगा मृत्यू झाला. प्रशांत असे त्या मुलाचे नाव. प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. त्याची पहिली पत्नी गावी राहत आहे. सकलसिंग हा सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत सानपाड्यात राहत होता.

रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत वाद सुरू होता. सोमवारी सकाळी हे कुटुंबीय सानपाडा रेल्वे स्थानकात आले. त्या ठिकाणीही त्यांचा वाद सुरू होता. याच रागातून सकलसिंग याने मुलगा प्रशांत याला उचलून आपटून त्याची हत्या केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या प्रकरणी सकलसिंग याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!