’उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला‘, महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

मुंबई,

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केलेली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातील पालघरमध्ये अशीच काहीशी घटना घडलेली होती, त्यावेळी राज्य सरकारवर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अशातच आताही या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, ‘नरेंद्र गिरी महाराज यांच्या मृत्यूचं जे प्रकरण समोर आलं ते अत्यंत रहस्यमय आहे. आत्महत्या जरी म्हणत असाल, तरी त्यांच्या भक्तांनी ती हत्या वाटतेय. त्यामागे कोणतं षड्यंत्र आहे, नक्की काय आहे? याचा तपास होणं गरजेचं आहे. पालघरमध्ये काही साधूंचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला तेव्हा तो हिंदुत्वावर हल्ला असा आवाज भाजपनं देशभरातून उठवला होता. पण नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूंच प्रकरण समोर आलंय त्यातून कुणीतरी उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटलेला दिसत आहे. याची चौकशीसुद्धा सीबीआयकडून व्हावी. तसेच नरेंद्र गिरींच्या भक्तांची देखील मागणी आहे. हा मृत्यू अत्यंत रहस्यमय आहे. ते आत्महत्या करतील असे मला वाटत नाही. याची कारणे शोधायला पाहिजे आणि ते कोणी शोधायची हे ठरवायला हवं. कोणीतरी हिंदुत्वाचा गळा घोटला असंच क्षणभर वाटलं.‘

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये यापुढे मठाची जबाबदारी कोणाकडे देण्यात यावी हे सविस्तरपणे लिहलं आहे. त्यामध्ये शिष्य आनंद आपल्याला त्रास देत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्या आधारे पोलिसांनी आनंद गिरीला अटक केली आहे. पण त्या आधीच आनंद गिरीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, महंत नरेंद्र गिरी यांची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. यामध्ये कुणाचा सहभाग आहे याचा खुलासा पोलिसांनी करावा असंही त्यांनी म्हटलं होतं. जर या प्रकरणात आपण दोषी सापडलो तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी असं आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!