राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार
म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. १०: राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या काळात कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले असून गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात देखील सुमारे २ लाख २८ हजार मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यंदा १० ते १६ जून २०२१ या कालावधीत दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यासाठी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक व आरोग्य कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांतर्गत मधुमेह रुग्णांकरिता नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून त्या रुग्णांची फंडस स्कोपी करणे तसेच म्युकरमायकोसिस डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात वेबिनार अथवा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लहान मुलांमधील अंधत्व, कोरोनापश्चात म्युकरमायकोसिस या विषयावर वैद्यकीय महाविद्यालय / रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी/अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ञ डॉक्टर यांचेमार्फत प्रतिबंधक उपचार यावर चर्चासत्र आयोजित करावेत, म्युकरमायकोसिसमध्ये डोळ्याची निगा कशी करावी याबाबत जनजागृती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले, खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ८० हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचा जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक १० जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृतिनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरु आहेत.
राज्यात आजमितीस ६९ नेत्र पेढ्या, ७७ नेत्र संकलन केंद्र, १६७ नेत्र संकलन केंद्र कार्यरत आहेत. मार्च २०२० पासून कोरोना महामारीशी लढा देत आहोत. राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोविड महामारीमध्ये कार्यरत असून देखील त्यांनी २ लाख २८ हजार इतक्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. १३५५ नेत्र बुब्बुळे संकलन करण्यात आले आहे.