नरेंद्र मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही; संजय राऊतांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

मुंबई,

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असून आज मोदी 71 वर्षांचे झाले. त्यानिमित्त त्यांनी देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत शिवसेना खासदार आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशातील मोठे नेते आहेत. ते आता देशाचे नेतृत्व करत आहेत. आम्ही त्यांच्या संघर्षाचा काळ जवळून पाहिला आहे. देशाला त्यांच्या कार्यकाळात राजकीय स्थैर्य आले आहे. आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणार्‍या भाजपकडे एकहाती सत्ता येणे ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य केले पाहिजे. देशात नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही. त्यांच्या भूमिकेविषयी, कार्याविषयी कितीही वाद असले तरी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.

त्यांनी आजच्या जीएसटी परिषदेसंदर्भातही भाष्य केले आहे. मोदी या परिषदेतून जनतेला कोणते गिफ्ट देतील, असा सवाल विचारण्यात आला असता राऊत म्हणाले, आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे बघावे लागेल. पण मला खात्री आहे की देशातील महागाईसंदर्भातल्या जनतेच्या तीव- भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, असेही राऊत म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!