…म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली‘ मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई,
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या विधानामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत.
हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनलं आहे ते फारकाळ चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काय मनकवडा नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय सांगू शकणार नाही.