50 कोटींच्या विम्यासाठी पत्नीकडून पतीच्या हत्येचा कट; पतीच्या बहिणीचा आरोप
मुंबई
पतीच्या मृत्यूनंतर मिळणार्या 50 कोटींच्या विम्यासाठी नवी मुंबई शहरात एका पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे. त्यामुळे 4 महिन्यांनी मृत व्यक्तीचा मृतदेह कबरीतून काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रकारामुळे नवी मुंबई शहरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सोहेल मुंशी असून, 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या गाडीचा वाशी पुलावर अपघात झाला होता. या अपघातात सोहेल यांचा मृत्यू झाला होता. अपघातसमयी सोहेल हे गाडी चालवत होते, अशी त्यांच्या पत्नीने माहिती दिली होती. मात्र, अपघातसमयी सोहेल यांची पत्नी गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली असून, गाडीचे एअरबॅग्ज देखील उघड्या होत्या. त्यामुळे जीव जाण्याची संभावना तशी कमी असते. याप्रकरणी मृत सोहेल मुंशी यांच्या बहिणीने संशय व्यक्त केला आहे. मृत सोहेल मुंशी यांचा इपोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. सोहेल यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे पैशाच्या मोहापायी तसेच 50 कोटींच्या विम्यासाठी सोहेल यांची विष देऊन हत्या केली असावी, असा संशय सोहेल मुंशी यांच्या बहिणीने व्यक्त केला आहे. हत्येला 4 महिने उलटून गेल्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
12 मे ला स्वत:च्या गाडीने सोहेल मुंशी त्यांच्या पत्नी व मुलांसोबत नवी मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला वाशी पुलावर कंटेनरने ठोकल्याने अपघात झाला. यावेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या सोहेल मुंशीचा मृत्यू झाला होता. अपघात झाला तेव्हा सोहेल यांना हृदयविकाराचा झटका आला अशी त्यावेळी माहिती मिळाली होती.
सोहेल यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून, त्यांचा घातपात झाला आहे. त्यांच्या मृत्यूला सोहेल यांची पत्नी जबाबदार असून, तिने सोहेल यांच्या हत्येचा कट रचला असावा, अशी तक्रार मृत्यूनंतर 4 महिन्यांनी सोहेल यांच्या बहिणीने दाखल केली आहे. त्यामुळे आता 4 महिन्यांनी हा मृतदेह कबरीतून बाहेर काढणार असून, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची परवानगी देखील पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.