परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा दणका; चौकशीविरोधातली याचिका फेटाळली
मुंबई,
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या विविध आरोपांची चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना चांगलाच दणका बसला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंह जोरदार चर्चेत आले होते. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतरच आपली चौकशी सुरू झाल्याचा दावा परमबीर सिंह यांनी याचिकेद्वारे केला होता.
दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ-ष्टाचाराचे प्रकरण आपण उघड केल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेऊन तपास केला जात आहे, असा दावा परमबीर सिंह यांनी या याचिकेमध्ये केला होता. 1 एप्रिल 2020 आणि 20 एप्रिल 2021 रोजी आपल्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, आपण पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केल्यानंतरच आपली चौकशी सुरू करण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले होते.