”गेल्या 2 वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही”, राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारवर टीका; उद्याच देणार अहवाल
मुंबई,
साकीनाक्यातील महिलेवरील बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आज राष्ट्रीय महिला आयोगाची टीम साकीनाक्यात दाखल झाली. आयोग सदस्या चंद्रमुखी देवींनी घटनास्थळी भेट घेऊन
पीडितेच्या परिवाराचीही भेट घेतली. यावेळी महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
गेल्या 2 वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही असं म्हणत महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चंद्रमुखी देवी म्हणाल्या आहेत. उद्याच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि केंद्र सरकारला रिपोर्ट देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली असून पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. पीडितेवर उपचार करणार्या डॉक्टरांचाही देखील जबाब नोंदवण्यात येणार असल्याचं महिला आयोगाच्या सदस्यांनी सांगितलं. यासोबतच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेऊ. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटलं आहे.
राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. येथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही आहे की सरकार इतके असंवेदनशील कसं आहे की त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही, अशा शब्दात महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत.
महाराष्ट्रात राज्य महिला आयोग नसल्यानं आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. या सरकारला महिलांबाबत कोणतीही चिंता नाही आहे. राज्य सरकारनं याबाबत उत्तर द्यायला हवे, असंही सदस्यांनी म्हटलं आहे.
पोलीस आयुक्तांनी पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही असं वक्तव्य पोलीस आयुक्त करतात हे फार निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही कळतं. पण पोलिसांचा एक धाक असतो. तो पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलिसांची दहशत असते, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असतो. तो निर्माण करायला हवा. ते न करता अशी विधान करणं चुकीचं असल्याचंही चंद्रमुखी देवी म्हणाल्या आहे.