मानहानी प्रकरण : कंगनाला दिलासा नाही; जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका फेटाळली

मुंबई

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने न्यायालयात दाखल केली होती. यावर 1 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला होता. तो आज घोषित करण्यात आला.

काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य कंगनाने केले होते. ॠतिक रोशन संदर्भात जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. यावर जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले होते. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

काय म्हटलं होते कंगनाने?

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ॠतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसं तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणार्‍या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!