कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 24 तास महत्त्वाचे, मुंबईसह पुण्यालाही इशारा
मुंबई,
गेल्या आठवड्यापासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणं भरली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यानंतर आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पण पुढील चोवीस तासांत कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज हवामान खात्यानं एकूण पंधरा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून याठिकाणी वादळी वार्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑॅरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी येत्या काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, मुंबईसह पुणे, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव औरंगाबाद आणि जालना या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा आणि आकाशात विजा चमकत असताना, मोठ्या झाडाखाली थांबू नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे, उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण कोकणात मात्र उद्याही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण आठवड्याचा शेवटी शनिवार आणि रविवारी दक्षिण कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवसांसाठी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना ऑॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे.