आयसीआयसीआय लोम्बार्डकडून भारती अॅक्साच्या जनरल इन्शुरन्स व्यवसाय अधिग्रहणास आयआरडीएआयची अंतिम मंजुरी प्रदान
मुंबई, ता.4 सप्टेंबर 2021ः
भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा बिगर जीवन विमा व्यवसायअधिग्रहण करण्याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने 21 ऑगस्ट 2020 ला केलेल्या घोषणेनंतर विविध पातळीवरील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्याने भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयने या अधिग्रहणास आयसीआयसीआय लोम्बार्डला शुक्रवारी 3 सप्टेंबरला अंतिम मंजुरी प्रदान केली आहे.
सदर कंपनीचे विलीनीकरण करण्याच्या योजनेला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) 2 नोव्हेंबर 2020 ला मान्यता दिल्यानंतर बीसई आणि एनएसई लिमिटेडने अनुक्रमे 2 आणि 3 नोव्हेंबर 2020 ला निरीक्षण पत्रे प्रदान केली होती. त्यानंतर भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने 27 नोव्हेंबर 2020 ला या विलीनीकरणास तत्वतः मंजुरी दिली होती. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर समभागधारकांनी 23 फेब्रुवारी 2021 ला अधिग्रहणास मंजुरी दिली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठाने 13 मे 2021 ला या व्यवहारास मान्यता दिली होती. आता आयआरडीआयएने आपल्या 3 सप्टेंबर 2021 च्या पत्रात उभय कंपन्यांमधील या व्यवहारास अंतिम मंजुरीचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्डला दिले आहे.
प्रस्तावित व्यवहारामुळे अर्थपुर्ण उत्पन्न आणि उभय कंपन्यांच्या व्यवहारांचे एकत्रीकरणामुळे कंपनीच्या सभासदांना मुल्यवृध्दी होणार आहे. त्याचबरोबर पॉलिसीधारक आणि भागीदारांना विस्तारीत विमा प्रकारांचा फायदा होणार आहे, तसेच ग्राहकांशी आणखी नजीकचे संबंध प्रस्थापित होणार आहे. एकत्रित व्यवसायामुळे उभय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात व्यापक संधी आणि नवीन भौगोलिक प्रदेशात व्यवसायवृध्दीची संधी मिळणार आहे.