मुंबई लोकलच्या प्रवाशी संख्येत मोठी घट, फक्त 30 लाख प्रवाशांचा दररोजचा प्रवास
मुंबई,
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मुंबईची लाईफलाइन गेल्या महिन्यात सुरु करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वेनं प्रवास करता येत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनापूर्वी दररोज 80 लाख अधिक प्रवासी लोकलनं प्रवास करत होते. मात्र आता या संख्येत घट होऊन ही संख्या 30 लाखांवर आली आहे.
सध्या कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येत आहे. त्यातच केवळ पासधारकांनाच प्रवास करता येतोय. आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 5 लाख प्रवाशांनी मासिक पास काढल्याचं समजतंय.
ताज्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लसीकरण झालेले केवळ 4.94 प्रवाशांनी लोकलचा मासिक पास काढला आहे. समोर आलेली ही आकडेवारी 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीतील आहे. मध्य रेल्वेवर 19 लाख तर पश्चिम रेल्वेर 11 लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत.
जाणून घ्या नियम
लशीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच लोकलने प्रवास
यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेचा पास डाऊनलोड करावा
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतात.
लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.