ठाकरे सरकारकडून मागील दीड वर्षापासून महाराष्ट्र बंदीवान – आशिष शेलार

मुंबई,

सण-उत्सवांना राज्य सरकारचा विरोध नाही, आमचा कोरोनाला विरोध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मग बार, पब आणि डिस्कोला ठाकरे सरकारने कशी सूट कशी ? बार, पब आणि डिस्को मधली गर्दी ठाकरे सरकारला दिसत नाही का? हे सर्व सुरू करण्याला परवानगी दिली कशी? सण-उत्सव साजरे करत असताना केंद्र सरकारने पाठवलेले पत्र राज्य सरकार दाखवते. मग बार, रेस्टॉरंट, डिस्को आणि पब येथे गर्दी होत नाही का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे.

केंद्र सरकारचे पत्र दाखवून केवळ सोयीचे राजकारण राज्य सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी शेलार यांनी केला. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 2019 साली शिवसेनेने ‘पहिले मंदिर, फिर सरकार‘ अशी घोषणा दिली होती. मात्र आता ’पहले मदिरालय, बाद मे मंदिर’ अशी घोषणा ठाकरे सरकार देत आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. जिथे वाटा मिळतो तेथे ठाकरे सरकार निर्बंध शिथील करते. ठाकरे सरकारमधील एका खासदाराच्या नातेवाईकांकडून प्रत्येक क्षेत्रातील लोकांसोबत वाटाघाटी करून निर्बंध शिथील केले जात असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्य सरकारने नियमावली जाहीर करून मंदिरेही खुली केली पाहिजेत. तसेच राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. शेकडो मंडळे सार्वजनिक गणपतीची स्थापना करतात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी. एका विशिष्ट वर्गाला खूष करण्यासाठी हिंदु सणांवर शिवसेनेकडून निर्बंध आणले जात असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाकडून घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचे स्वागतही आशिष शेलार यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा, म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला शेलार यांनी लगावला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!