मंदिरं उघडली नाहीत तर बळजबरीनं उघडावी लागतील, भाजपाचा राज्य सरकारला इशारा
मुंबई,
राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
’सरकार विचार करताना काय विचार करतं माहित नाही, दारूची दुकानं उघडी आहे, बिअर बार उघडे आहेत, कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाहीए. त्याठिकाणी कसलेही निर्बंध नाहीत. पण मंदिरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंग होणार नाही असं वाटतं हा जो गैरसमज आहे तो काढून टाकला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाविकांना मंदिरातून ऊर्जा मिळते, फक्त महाराष्ट्रच असं राज्य आहे जिथे मंदिर बंदच आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तर मंदिरं उघडली नाहीत, तर बळजबरीनं उघडावी लागतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील सध्या अमरावतीच्या दौर्यावर आहेत. राज्यातील मंदिरं बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर यावेळी त्यांनी टीका केली.
महाविकास आघाडीतील नाराज नेते रात्रीचे येऊन आम्हाला भेटतात, महाविकास आघाडीने आपली माणसं सांभाळावी असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.