१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री करणार स्वागत
गेट-वे-ऑफ इंडिया येथे उद्या कार्यक्रम
मुंबई, दि. ३१ : –
भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत. स्वर्णिम विजय वर्षानिमित्त आयोजित परिक्रमेतील या मशालीचे उद्या बुधवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री समारंभपूर्वक स्वागत करतील.
भारताने पाकिस्तानला १९७१च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय वर्ष मशालीचे १ सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय मशालीचे गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन होईल. ही मशाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल व चक्र पुरस्कारार्थींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. यावेळी भारतीय लष्कराचा वाद्यवृंद सादरीकरण करेल.