’सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील’ ईडी कारवाईवरुन संजय राऊत यांचा इशारा

मुंबई,

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीच्या कारवाईबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या संबंधीत महत्त्वाच्या लोकांवर गेल्या काही दिवसांपासून या कारवाया सुरु आहेत, ठिक आहे, तुमच्या हातात शस्त्र आली, अस्त्र आली केंद्रीय तपास यंत्रणांची आणि तुम्ही काही गोष्टी खणून काढतायत, खणत रहा, पण जो खड्डा होतोय त्यात केव्हातरी तुम्ही सुद्धा पडू शकता, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

अनिल परब भेटीवर बोलताना संजय राऊत यांनी अनिल परब नेहमीच भेटत असतात, माझे सहकाही आहेत ते शिवसेनेचे मंत्री आहेत असं म्हटलं आहे. ईडीची नोटीस आली म्हणून आमच्या चेहर्‍यावरचं हास्य काही मावळणार नाही. कर नाही त्याला डर कशाला, आम्ही सामोरं जाऊ. शिवसेना हे टार्गेट आहे, ते टार्गेट का केलं जातंय हे सर्वांना माहित आहे, पण त्याचा तसुभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, आणि शिवसेनेचं मनोधैर्यही खचणार नाही, उलट ते अधिक मजबूत होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई त्याच पद्धतीने लढायच्या आहेत. अनिल परब हे कायदा क्षेत्रातले जाणकार आहेत, ते स्वत: वकिल आहेत, त्यांना माहित आहे काय करायचं ते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण त्यातून या सर्व कारवाया सुरु आहेत. सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे, यावर बोलताना संजय राऊत यांनी आम्ही पण यादी जाहीर करणार, ये पब्लिक है, सब जानती है, ईडी आणि भाजपची हातमिळवणी असल्याचा आरोप केला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!