मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक.. सुधीर मुंगटीवारांचे बाबूलनाथ मंदिराबाहेर आंदोलन

मुंबई,

मंदिरे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिराबाहेर आंदोलन केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलना दरम्यान सुधीर मुनगंटीवार तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील एका आठवड्याच्या आत राज्य सरकारने राज्यभरातील सर्व मंदिरे सर्वसामान्य भाविकांसाठी खुली करावीत. नाहीतर, भारतीय जनता पक्षाकडून हे आंदोलन अजून तीव- केले जाईल, असा इशाराही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला दिला.

राज्यातील मंदिरे सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आज राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. याआधीही राज्य सरकारने मंदिरे खुली करावी त्यासाठीचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीने दिला होता. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आली आहेत. हॉटेल, मॉल्स आणि दारूची दुकाने हे सर्व अटी-नियम लागू करून खुली करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली. मग मंदिरातही दर्शनासाठी अटी नियम लावून, मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात असलेल्या महत्त्वाच्या मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे.

राज्यभरातील मंदिरे कोरोना संसर्गामुळे बंद –

कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसेच शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!