राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी ‘माझे रेशन, माझा अधिकार’ अभियान राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत
मुंबई, दि.४ : कोरोनाच्या कठीण कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी ‘माझे रेशन, माझा अधिकार’ या अभियानांतर्गत माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी TISS संस्थेची मदत घेण्यात येत असून त्यांच्यासह इतर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुंबईचे शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्काचे देय असलेल्या अन्नधान्याचा तपशील शासनाच्या mahaepos.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती लाभार्थ्यांना मिळण्यासाठी संस्थांनी मदत करावी, ‘एक देश, एक रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत परप्रांतीय, स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांना राज्यांतर्गत तसेच जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून अन्नधान्याचा लाभ घेता येतो याची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहचवावी यासाठी प्रयत्न करावे. NER मध्ये वर्ग करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांची शासनाने या कोरोनाच्या कठीण काळाची दखल घेऊन अन्नधान्य वितरण सुरु केले आहे. ही माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना अन्नधान्य वितरणासंबधी तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक 022-22851428 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर तक्रार नोंदविता येत असल्याची माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी. या कामी मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्रात संबंधित शिधावाटप अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना जास्तीत जास्त लाभ व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पगारे यांनी केले आहे.