नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी पार्क उद्योग, पर्यटनदृष्ट्या सर्वोत्कृष्ट ठरावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पार्क उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य; जीजेईपीसीकडून सादरीकरण
मुंबई, दि. ४:- नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्क (आयजेपीएम) जागतिक पातळीवर उद्योग आणि पर्यटनदृष्ट्या सर्वोत्कृष्ट ठरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. या पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
या पार्कबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे (जीजेईपीसी) अध्यक्ष कॉलीन शाह यांनी सादरीकरण केले.
मुंबई रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात देशात आघाडीवर आहे. जगातही मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रात मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या क्षेत्रातील व्यवसाय आहे. त्यामुळे उलाढालही होते आणि रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्राचे हे स्थान अबाधित राखतानाच, परकीय गुंतवणूक आणता येणार. बाहेरचे उद्योग येथे येण्याने आणखी मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत. सर्व बाबी लक्षात घेऊन, या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे (जीजेईपीसी) अध्यक्ष कॉलीन शाह, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली, परिषदेचे उपाध्यक्ष विपुल शाह, सदस्य रसेल मेहता, व्यवस्थापकीय संचालक एस. रे आदी उपस्थित होते.