श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. 30 :

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सुरक्षितपणे सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, समाजातील अपप्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवून आपणही वाईट प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे. वाईट विचारांना तिलांजली दिली पाहिजे. समाजासाठी विनाशकारी ठरणारी गोष्ट नष्ट करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. आधुनिक काळात विनाशकारी कोरोनाला संपवण्याचा संकल्प श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आपण करुया.

दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदाने साजरी केली जाते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाळगोपाळांचा हा उत्साह, आनंद आपल्यालाही सुखावतो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे आतापर्यंतचे सर्वच सण अतिशय साधेपणाने आपण साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साधेपणाने घरीच साजरी करावी. दहीहंडी उत्सव साजरा करू नये. सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे, सार्वमताचा आदर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!