माजी आमदार संतोषराव दसपुते यांच्या निधनाने निष्ठावान नेतृत्त्व हरपले!: ना. अशोक चव्हाण
मुंबई,
जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अॅड. संतोषराव दसपुते यांच्या निधनाने एक निष्ठावान नेतृत्त्व हरपल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
अॅड. दसपुते यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना ना. चव्हाण यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. राजकारणातील एक वैचारिक, संयमी व जनतेप्रती तळमळ असलेले नेते म्हणून त्यांची प्रतीमा होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले अॅड. संतोषराव दसपुते यांनी आपल्या सेवाभावी स्वभावातून लोकांचा विश्वास कमावला व त्या बळावर त्यांना दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. माजी केंद्रीय गृह मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने तरूण वयापासून काँग्रेसची विचारधारा जोपासणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे अशोक चव्हाण यांनी नमूद केले.