राज्यपाल आता 4 दिवस राज्याबाहेर, मुख्यमंत्र्यांची भेट लांबली!

मुंबई,

राज्यपाल नियुक्त 12 आमदाराची यादी गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना भेटीची वेळ मागितली होती. पण, ही भेट आता नाकारण्यात आली आहे. तर राज्यपाल आता चार दिवसांच्या दौर्‍यावर राज्याबाहेर चालले आहे. त्यामुळे तिथून आल्यावरच भेट होणार हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. पण राज्यपाल आता चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौर्‍यावर जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेट दिल्लीत घेण्याची शक्यता आहे. दिल्ली दौरानंतर ते उत्तराखंड येथेही जाणार आहे. त्यामुळे आता  महाविकास आघाडीच्या  नेत्यांना चार दिवसानंतर भेट आता देणार आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून हायकोर्टाने राज्यपालांनी लवकरच निर्णय घ्यावा, आधीच 8 महिने उशीर झाला आहे, असं मत नोंदवलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजभवनावर चहाला या असं निमंत्रण दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ मागितली होती. पण पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे भेट घेता येणार नाही, असं राज्यपाल यांनी सांगितलं होतं.

आज, मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती, त्यावेळी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी  राज्यपाल यांना फोन लावला. तेंव्हा राज्यपाल म्हणाले 6.30 या. पण, माध्यमांमध्ये बैठक रद्द झाल्याचे वृत्त आल्यामुळे ही भेट रद्द करण्यात आली.  त्यामुळे, अधिकृत भेटीच वेळ ठरवण्यासाठी मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले.  राज्यपालांशी चर्चा करून राजभवन येथून नार्वेकर बाहेर पडले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार होते. हे बर्‍याच दिवसांपासून सुरू होतं. पण, राजभवनाकडून त्यांनी भेटीसाठी वेळच दिला नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हायकोर्टाने आदेश दिला आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेले. त्यानंतर आता भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

तसंच, राज्यपालांनी जर यादी मंजूर केली तर भाजपमध्ये मोठी फूट  पडण्याची चिन्ह आहे. कारण त्यांनी अनेकांना आश्वासनं दिली होती. हे सरकार पडल्यानंतर हे लॉलिपॉप देण्यात आलं होतं, त्यामुळे राज्यपालांनी हा निर्णय घेतला नसून त्यांच्यावर दबाव आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!