श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना कायमचं कुणी उठवलं? चौकशी करा’, शिवसेनेची मागणी
मुंबई
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. काल नारायण राणे यांना हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर आज सलग दुसर्या दिवशी सामनाच्या अग-लेखातून भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली आहे. सामनात म्हटलं आहे की, नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ’ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ’वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात, असं सामनात म्हटलं आहे.
आज सलग दुसर्या दिवशी सामनाच्या अग-लेखातून भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ’पर’आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ’नॉर्मल’ असो वा राणेंसारखा ’अॅबनॉर्मल’ कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले, असं सामनाच्या अग-लेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग-लेखात म्हटलं आहे की, राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. राणे यांची अटकही इतर सामान्य गुन्ह्याप्रमाणे आहे. असे गुन्हे इकडे तिकडे घडतच असतात. कोणीतरी कुणाला धमक्या देतो, जीवे मारू असे बोलतो. त्यावर समोरची फिर्यादी व्यक्ती इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल करते. पुढे पोलीस आपले काम करतात. राणे यांच्याबाबतीत वेगळे असे काहीच घडल्याचे दिसत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्रात तालिबानी पद्धतीचे राज्य सुरू आहे काय?’ वगैरे सवाल विरोधी पक्षाने उपस्थित करणे निरर्थक आहे. “राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणार्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही, असंही लेखात म्हटलं आहे.
लेखात पुढं म्हटलं आहे की, राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? कायद्याने चाललेले राज्य मोडण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत, पण त्यांचे प्रयत्न चिरकूट पद्धतीचे आहेत. हे राज्य जितके आजच्या सत्ताधारी पक्षाचे आहे तेवढेच ते विरोधी पक्षांचेही आहे. तेव्हा राणे यांच्या अटकेनंतर भाजपावाल्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते, असा टोलाही लगावला आहे.