भारताच्या शैली सिंहनं रचला इतिहास, लांब उडीत पटाकवले सिल्व्हर मेडल!
मुंबई,
भारतीय एथलिट शैली सिंहनं जबरदस्त कामगिरी करत इतिहास रचला आहे. शैलीनं अंडर-20 वर्ल्ड एथलेटिक्स चैम्पियनशिप स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. शैलीनं 6.59 मीटर लांब उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला. तिचे गोल्ड मेडल फक्त 1 सेटींमीटरनं चुकलं. स्वीडनच्या माजा असकागनं 6.60 मीटर लांब उडी मारत गोल्ड तर युक्रेनच्या मारिया होरिलोवानं (6.50 मीटर) ब-ॉन्झ मेडल पटकावले. नैरोबीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचे हे तिसरे मेडल आहे.
शैलीनं महिलांच्या फायनलमध्ये पहिल्या आणि दुसर्या प्रयत्नात 6.34 मीटर लांब उडी मारली. त्यानंतर तिसर्या प्रयत्नात तिने 6.59 मीटर लांब उडी मारत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. तर शेवटच्या प्रयत्नात तिनं 6.37 मीटर लांब उडी मारली होती.
शैलीनं जून महिन्यात 6.48 मीटर लांब उडी मारत राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. झाशीमध्ये जन्म झालेल्या शैलीला तिच्या आईनं मोठं केलं आहे. तिची आई लोकांचे कपडे शिवून घराचा खर्च भागवते. शैली सध्या बंगळुरुमध्ये प्रसिद्ध एथलिट अंजू बॉबी जॉर्जच्या अकदामीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. अंजू जॉर्ज यांचे पती बॉबी जॉर्ज हे तिचे प्रशिक्षक आहेत.
यापूर्वी या स्पर्धेत भारताच्या अमित खत्रीनं 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणार्या नीरज चोप्रानं 2016 साली या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते.