गौरवशाली परंपरा असणाऱ्या औसा शहराच्या उज्ज्वल भविष्यासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औसा शहरवासियांशी साधला ऑनलाईन संवाद
मुंबई, दि. १९ : औसा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच, परंतु औसाचे भविष्य अधिक उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ, सहकार्य असेल. औसा नगरपरिषदेला शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
औसा शहरातील विविध विकास कामांचे नुकतेच उद्धाटन करण्यात आले होते. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून लातूर जिल्ह्यातील औसा शहरवासियांशी ऑनलाईन संवाद साधला. या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाला औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, उपनगराध्यक्षा श्रीमती किर्तीताई कांबळे, माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी, पाणीपुरवठा सभापती गोविंदराव जाधव, मुख्याधिकारी सौ. वसुधाताई फड, सुलेमानजी शेख, पठाण वलिखाँन्जी, औसा नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औसा शहरवासियांसाठी विकासकामांचा डोंगर उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ तारखेला, ऑगस्ट क्रांतिदिनी औसा-माकणी पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण, शिवकालीन मराठा भवनाचे लोकार्पण, सांस्कृतिक सभागृहाचे नुतनीकरण, किल्ला वेस ते जलालशाही चौक रस्ता-कामाचं उद्घाटन, अशा अनेक विकासकामांचे उद्घाटन आपण केले. यातून औसा शहराच्या विकासाला एक चांगली दिशा, गती मिळाली आहे. यातून जिल्हावासियांना, राज्यातल्या जनतेला एका चांगला संदेश देण्याचे काम आपण केले आहे. औसा शहराला ऐतिहासिक वारसा आहे. इथे अनेक ऐतिहासिक इमारती, भूईकोट किल्ला, ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांचे जतन झाले पाहिजे. पर्यटनवाढीला चालना दिली पाहिजे. यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
औसा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण औसा-माकणी पाणीपुरवठा पाईप लाईन योजना मार्गी लावली. माकणी-निम्न तेरणा प्रकल्प मार्गी लागला आहे. तब्बल ३७ किलोमीटर अंतरावरुन औसा फिल्टरस्थळापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली आहे. औसा नगरपरिषदेने स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनावर येणाऱ्या काळात अधिक काम करावे, सांडपाण्यावर प्रक्रीया करुन त्याचा पुनर्वापराचे नियोजन करावे, पाण्याचा काळजीपूर्वक वापर, पुनर्वापर याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी-अधिकारी यांना यावेळी केल्या.
शहराच्या विकासासाठी नागरीकांनी नियमित कर भरला पाहिजे. औसा नगरपरिषदेने औसा शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे. गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाशी लढत आहोत. यापुढच्या काळात देखील आपण अधिक खबरदारी बाळगली पाहिजे. सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी औसा नगरपरिषदेने संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन सर्व उपाययोजना राबवाव्यात, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी विविध विकासकामांचे ऑनलाईन सादरीकरण करून औसा नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.