यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; आयकर विभागाची केली फसवणूक

मुंबई,

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची दिवसेंदिवस नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी आयकर विभागाने केली आहे. त्यामुळे जाधव यांची आमदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव अडचणीत आल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईतील भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता. आयकर विभागाने जाधव यांच्यावर फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. 2019 मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राच्या चौकशीत ही बाब समोर आली. तसेच कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाचा समावेश असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. तसेच यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास 7.5 कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात 2.74 कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी संपत्ती असल्याचे समोर आले होते. ज्यात 1.72 कोटींची स्थावर मालमत्ता होती. तसेच यामिनी जाधव यांनी प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटींचे कर्ज घेतले होते. जेव्हा याचा तपास सुरु झाला तेव्हा हा पैसा त्यांचाच असल्याचे समोर आले. तसेच प्रधान डिलर्स नावाची एक शेल कपंनी कोलकात्याकडून उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत होता. उदय महावरचे नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आले होते. या प्रकरणाचा तपास केला असता 15 कोटींची हेराफेरी झाल्याचे समोर आल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, आमदार यामिनी जाधव यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!