100 कोटी वसुली प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत मुभा द्या; अनिल देशमुखांच्या वकिलांची ईडीला विनंती

मुंबई,

अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून यावर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला थोडी मुभा दिली जावी अशी विनंती आम्ही ईडीला केली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली. तसेच आम्ही ईडीला सहकार्य करत आहोत. मात्र, तरीही ईडी वारंवार समन्स पाठवत आहे, असे अनिल देशमुख यांच्या वकिलांनी म्हटले आहे. आम्ही सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग-ेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने पाचवा समन्स बजावला आहे. आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता त्यांना सक्तवसुली संचालनालय यांच्या कार्यालयात उपस्थित राहायचे होते. मात्र, ते आजही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांच्यावतीने वकील हजर राहिले. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. यानंतर ईडी याप्रकरणाचा तपास करत आहेत.

आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना चार समन्स बजावले आहेत. मात्र, चारीही वेळा देशमुख प्रकृतीचे कारण देत ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. मागच्या सोमवारी सुप्रीम कोर्टातुन देखील अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे ईडीसमोर हजर होऊ शकत नाही, असही कारण दिले जात होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकार्‍यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, सध्या अनिल देशमुख कुठे आहेत याची माहिती नाही. मात्र, अनिल देशमुख हे सध्या दिल्लीमध्ये असल्याचा दावा त्यांच्या वकीलांकडून केला जात आहे. ईडी कार्यालयात हजर राहायचे की नाही राहायचे याचा संपूर्ण निर्णय अनिल देशमुख घेणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!