टीसीएसच्या शेअरच्या किमतीने गाठला आजवरचा उच्चांक, एम-कॅप 13 लाख कोटींवर
मुंबई
देशातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) भांडवली बाजारमूल्याचा (एम कॅप) 13 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. टीसीएसच्या शेअरच्या किमतीने आजवरचा उच्चांक गाठल्याने कंपनीच्या भांडवली बाजारमूल्यात घसघशीत वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार टीसीएसच्या शेअरची किंमत 80.65 रुपयांनी वाढून 3522.40 रुपये झाली आहे. शेअरची किंमत वाढल्याने टीसीएसटे भांडवली बाजारमूल्य 13 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. रिलायन्सनंतर अशी कामगिरी केवळ टीसीएसला करता आली आहे. मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्सने जुलै 2020 मध्ये 13 लाख कोटी रुपयांच्या भांडवली बाजारमुल्याचा टप्पा ओलांडला होता.
मंगळवारी शेअर बाजाराच्या दिवसाखेअर रिलायन्सचे भांडवली बाजारमूल्य हे 13.69 लाख कोटी रुपये राहिले. तर टीसीएसचे भांडवली बाजारमूल्य हे 13.71 लाख कोटी रुपये राहिले आहे. गेल्या महिन्यात टीसीएसने जून तिमाहीदरम्यान 28.5 टक्क्यांनी अधिक नफा मिळविला आहे. टीसीएसने जून तिमाहीत एकूण 9,008 कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये दिवसाखेर 210 अंशांने उसळली घेतली आहे. इन्फोसिस, टीसीएस, एचयूएल आणि टेक महिंद्राच्या शेअरची किंमत वाढल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराने 55,854.88 हा आजवरचा सर्वात मोठा निर्देशांक गाठला आहे. निफ्टीचा निर्देशांक 51.55 अंशाने वाढून 16,614.60 वर पोहोचला आहे. टेक महिंद्राचे सर्वाधिक 3 टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ टीसीएस, नेस्ले इंडिया, टायटन, इन्फोसिस आणि एचयूएलचे शेअर वधारले आहेत.