पंतप्रधान मोदींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू – डॉ. भारती पवार
मुंबई,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सोपविलेल्या आरोग्य खात्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेच्या दुसर्या दिवशी ओझर ( जि. नाशिक ) येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या
या वेळी प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. अशोक उईके, आ. राहुल आहेर, किशोर काळकर, माजी आमदार मंदाकिनी कदम, यतीन कदम, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष गिरीश पालवे, ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव आदी उपस्थित होते. डॉ. पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आरोग्य खात्याचा कारभार देऊन जनतेची सेवा करण्याची खूप मोठी संधी दिली आहे. ही जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडेन.
प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले की, तब्बल 60 वर्षानंतर नाशिक जिल्ह्याला भारतीताईंच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाले आहे. याबद्दल नाशिककर जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे. आ. राहुल आहेर यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून डॉ. भारती ताई नाशिक जिल्ह्याचा कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. भारती पवार यांच्या यात्रेचे सोमवारी रात्री नाशिक शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत श्री राम चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले. ओझरकर नागरिकांच्या वतीने अनेक राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. भारती पवार यांचा सत्कार केला. पिंपळगाव बसवंत येथेही डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला. ओझर, पिंपळगाव, शिरवडे फाटा, वडाळी भोई, चांदवड मार्गे ही यात्रा मालेगावकडे रवाना झाली. वाटेत अनेक ठिकाणी यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.