लॉर्ड कसोटी- राहुल लॉर्ड च्या मानांकित तक्त्यावर तसेच भारतीयांच्या ह्रिदयावर
मुंबई,
कला ही आनंदाकरता नाही,मन:शांती करता नाही, मनोरंजनकारता नाही. कला ही त्याहून काहीतरी भव्य आहे असे टॉल्स्टॉय म्हणाला होता. क्रिकेट ही अशीच भव्य कला आहे. ती अभिराम आहे,रमणीय आहे, लालित्यपूर्ण आहे, शैलीदार आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गंभीर आहे.
ती रात्री नऊ नंतरचा ट्रान्स मध्ये घेऊन जाणारा विलंबित दरबारी आहे. मंद लयीतला वजनदार आणि समेवर दिमाखाने येणारा पेशकार आहे. निसर्गाने जे माणसासाठी करायचे बाकी ठेवले ते क्रिकेट कलेच्या रुपात पूर्णत्वास नेतो.
हे सगळे लिहायचे कारण म्हणजे लॉर्ड कसोटीचा पहिला दिवस या सर्व भावना सार्थ करणार्या होत्या. मंडपात विलक्षण शांतता असताना गायकाने रागाचे आव्हान पेलून लोकांना कधी अंतरबाह्य शांत करावे ,कधी अचंबित करावे,कधी रोमांचित करावे तसे राहुल आणि रोहितने अँडरसन च्या जादूमय गोलनदाजीचे आव्हान पेलले.
एण्डरसन सुद्धा असा मुरलेला कलाकार की त्याने राहुल आणि रोहित ह्या दोघांना अत्यंत अवघड प्रश्न विचारले.आणि तो सवालजवाब रसिकाला क्रिकेटच्या अनुष्ठानाला बसवून गेला.भाई वाह.ऐसा मजा आ गया की पुछो मत.ज्या निग-हाने आणि तंत्राने राहुल आणि रोहितने ऑफ स्टंप च्या बाहेरचे चेंडू सोडले त्याने गावस्कर सुद्धा हर्षभरीत झाला असेल.
अखेर गावस्करची बॅटिंगची तिसरी पिढी गावस्करचा पिचवर वारसा चालवत होती. चेंडू सोडायला तंत्र लागते पण हमखास बॅट ची एज घेणार असा चेंडू अचूक अंदाजाने सोडणे ह्याला जिनिअस लागतो. अँडरसनने, रॉबिनसनने असे अनेक चेंडू टाकले पण ज्या प्रकारे ते सोडले गेले ते लाजवाब होते.
काही फास्ट बॉलर्स खांद्याचा उपयोग करून तर काही अख्ख्या शरीराचा उपयोग करून बॅटसमनची दाणादाण उडवतात. पण अँडरसन मनगटाने कमाल करतो. त्यात बॉल सीमवर पडला तर बॅटसमनची खैर नसते.राहुल आणि रोहितने ’व्ही’ मध्ये खेळण्याचे टाळले आणि पॉईंट आणि मिडविकेटला धावा जमवल्या.
रोहित ने सलामीवीर म्हणून स्थान पक्के केले आहे ते तंत्र आणि संयम ह्या दोन्हीत आपण कमी नाही हे दाखवून.मोईनला सुद्धा फक्त एकदा पुढे जाऊन डोक्यावर मारलेला रोहित कसोटी क्रिकेट मध्ये पक्व झाला आहे.
डिफेन्स आणि बॉल सोडण्याचे कसब यावर भारताचे पारडे पहिल्याच दिवशी चांगलेच जड झाले आहे. आता जो स्कोर होईल तो इंग्लंडची परीक्षा पाहणारा असेल. वेल प्लेड इंडिया.