जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
निसर्गरक्षण व मानवकल्याणातील आदिवासी बांधवांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ८ :- “आदिवासी बांधवांच्या निसर्गपूजक रुढी, परंपरा, संस्कृतीमुळेच जगात माणसाचं अस्तित्व टिकून आहे. निसर्गरक्षण व मानवकल्याणात आदिवासी बांधवांचं नेहमीच मोठं योगदान राहिलं आहे. आदिवासी बांधवांनी कायम निसर्गाची पूजा, रक्षण केलं. हे करत करताना आदिवासी बांधवांनी आपलं अस्तित्व, अस्मिता, संस्कृती प्राणपणानं जपली. इंग्रजांकडून आदिवासी अस्मितेवर हल्ला होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सुरुवातीलाच शस्त्रं उचलणाऱ्यांपैकी आदिवासी बांधव होता. आज ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्तानं देशातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत असताना आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याचं, पराक्रमाचं, त्यागाचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासी बांधवांच्या पर्यावरणरक्षण, मानवकल्याणाच्या कार्याचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.